Wednesday, November 02, 2011

जळ (१)

तो दिवस चांगलाच आठवतो. बाहेर पावसाने जरा जोर धरला ना, की हा जो "तो दिवस" आहे ना तो अलगद मनात येतो. दिवस तसा नेहमीसारखाच होता. म्हणजे सुरू तरी एखाद्या अगदी अतिसामान्य, रूटीन, त्याचत्या दिवसासारखा. सकाळी सकाळी मी नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये येऊन बसलो होतो. काम काही विशेष नव्हतंच. म्हणजे माझ्या पोरांना कामाला लावून मी ऑफिसात आराम करायचं ठरवलं होतं. ऑडिट. ऑडिटर आहे मी. मी सही करतो आणि माझी पोरं कामं करतात. आर्टिकल क्लार्क्स.

असो तर सांगायचा मुद्दा हा की मी ऑफिसात एकटाच होतो. काल रात्रीपासूनच पावसानं जरा जोर धरला होता. जास्तच लागला पाऊस तर सरळ ऑफिस बंद करून घरी जायचा बेत होता. खिडकीतून बाहेर पाहिलं तर सगळं भिजलं वातावरण होतं. कौलाच्या पन्हाळ्यांचं काम राहिल्याचं तेव्हाही माझ्या डोक्यात आलं. तुटक्या पन्ह्याळ्यातून पावसाच्या पाण्याचा पुन्हा एकदा पाऊस होण्याचा खेळ चाललेला होता. एकंदरीत मुंबापुरीला सक्तीची विश्रांती देण्याचं काम पाऊस करणार असं वाटायला लागलं.

कॉम्प्युटर सुरूच होता. बाजूला फोनही होता. पण आज त्यानंही विश्रांती घ्यायची ठरवलेली होती. चाळा म्हणून कॉम्प्युटरवर इंटरनेट सुरू केलं. फोन का निपचीत पडला होता ह्याचं कारण समजलं. फोन लाइन डेड झालेली होती. तातडीने खिशातला मोबाईल काढून पाहिला. तो अजून जिवंत होता. उगाचच जरा बरं वाटलं. फोन परत खिशात ठेवणार इतक्यात तो वाजलाच. डोक्यावरची चाळीशी नाकावर ओढून नाव पाहिलं. विद्याचं होतं.

" बोल" मी म्हणालो.
" अहो, हॅलो, ऐकू येतंय का? " बहुतेक तिला बाहेरच्या पावसाच्या आवाजात फोनवरचं काही ऐकू येत नसावं.
" होय येतंय. बोल" मी जरा आवाज चढवूनच बोललो. बहुतेक तिच्या ते लक्षात आलं असावं.
" अहो. लवकर घरी येताय ना? मुंबई तुंबलेय सगळी. लोकल बंद आहेत, रस्ते पाण्यानं भरलेत." मी वाकून खिडकीबाहेर पाहिलं. पाऊस पडत होता पण रस्त्यावर पाणी साठल्यासारखं वाटलं नाही.
" लोकलचं सांगू नकोस. मध्य रेल्वेवर चिमणी मुतली तरी पाणी साचतं. इथे काही प्रॉब्लेम वाटत नाहीये. " मी उगाचच फार वेळा उगाळलेला विनोद पुन्हा उगाळला.
" अहो. तुम्ही ताबडतोब या, नाहीतर ऑफिसातच राहावं लागेल. " प्रकरण गंभीर होतं तर.
" प्रिया आली का घरी?"
" ती गेलीच नाही कॉलेजला पाऊस आहे म्हणून. लक्ष कुठे असतं हो तुमचं? " प्रिया घरीच होती. खरंच. चला मुलगी सेफ म्हटल्यावर मला बरं वाटलं.
" बरं बरं मी बघतो. येतो. फोन करतो. " मी फोन ठेवला.

नक्कीच काहीतरी गडबड होती. मी लगबगीनं टी. व्ही लावला. बातम्यांत तेच चाललेलं होतं. ऑफिसेस सोडून दिलेली होती. मी ताबडतोब मुलांना फोन केले. ही पोरं लांब लांब राहणारी उगाच नको तिथं अडकून पडतील आणि जीवाला घोर सगळ्यांच्या. सर्व मुलं हुशार असल्याने त्यांनी कामं कधीच आटोपती घेतलेली होती. कुणाचा धाक नाहीये ह्या पोरांना असं मला तेव्हाही वाटलो. घाई घाईने सगळं आवरलं. दिवे, ए. सी. बंद केला. अजूनही रस्त्यावर पाणी साठलेलं दिसत नव्हतं. मनातल्या मनात गाडी कुठच्या रस्त्यावरनं काढावी ह्याचा विचार करीत मी ऑफिसचा दरवाजा बंद केला. खिशातनं चावी काढणार इतक्यात फोन पुन्हा वाजला. विद्याला मनातल्या मनात शिव्या देत मी फोन घेतला.

" हॅलो" मी तिरसटपणे म्हणालो.
" काका, मी बोलतेय, पारुल" पलीकडून वेगळाच आवाज.
" ओह पारूल, बोल बोल. मला वाटलं विद्याचाच फोन आला पुन्हा. बोल, काय काम काढलंस? " खांदा आणि मान ह्याच्यात फोन पकडून बोलत असताना दुसऱ्या हातानं मी दाराला कुलूपदेखील घातलं.
" काका, कुठे आहात तुम्ही? घरी की ऑफिसात? "
" मी ऑफिस बंद करून घरीच जायला निघतोय. काय झालं? तू कुठे आहेस? "
" निघालात का तुम्ही? मग असूदे. "
" अगं पण काय झालं ते तर सांग. " स्त्री दाक्षिण्य.
" काका अहो मी पावसात अडकलेय. तुमच्या ऑफिसच्या दिशेला आहे. मेन रोडवर. तुफान पाणी साचलंय. ट्रेन बंद आहेत म्हणे. ह्या भागात माझं ओळखीचंही कुणी नाही, म्हणून फोन केला. पण तुम्ही जात असाल तर जा. मी मॅनेज करीन. " आली का पंचाईत.
" तू खूप लांब आहेस का? "
" नाही साधारण अर्धा तास लागेल. "
" बरं मी थांबतो तू ये. मग आपण दोघं घरी जाऊ. "

बंद ऑफिसाचं कुलूप मी पुन्हा उघडलं आणि आतमध्ये जाऊन बसलो.

पारुल. साधारण तिशीच्या आतबाहेरचं वय असेल हिचं. मला काका म्हणते. मला विशेष आवडत नाही ते. पण वय चोरूनही पन्नाशीच्या खाली ज्याला आपलं वय सांगता येत नाही त्याला तिनं म्हणावं तरी काय? मला एवढा हक्कानं तिनं फोन केला, पण आमची भेट कुठं झाली असावी? रेल्वेच्या डब्यात. बडोद्याला ऑडिटसाठी गेलो होतो, मुंबईला परत येताना सेकंड एसीच्या डब्यात माझ्या समोर ही बसलेली. बडोदा कायमचं सोडून मुंबईला चाललेली. नोकरीसाठी. कुठल्याश्या आयटी कंपनीत आहे म्हणे ती. मरीन ड्राइव्हला ते सावित्रीबाई फुले महिला वसतिगृह आहे ना तिथे राहते. आज इथे का कडमडली ही?

मी पुन्हा एकदा घड्याळाकडे पाहिलं. बाहेर पाऊस पडत होता पण तरीही ऑफिसात एसीशिवाय उकडतंच होतं. मी खिडकी बंद केली आणि एसीची घरघर पुन्हा सुरू केली. डोक्यावर गार वाऱ्याचा झोत आल्यावर जरा बरं वाटलं. हा तर काय सांगत होतो? सावित्रीबाई फुले वसतिगृह. तिथे ही राहते. लग्न झालेलं आहे पण नवऱ्याशी पटत नाही. म्हणूनच बडोदा सोडलं. मूल, बाळ काही नाही. मुंबईत एकटी आहे. ओळखीचंही कुणी नाही. ट्रेनमध्ये बोलता बोलता तिनं हे सगळं सांगितलेलं. खरा मी असा अनोळखी पोरींना माझा नंबर वगैरे देणाऱ्यातला नाही. पण काहून जाणे दिला तिला. एकटी मुलगी, अनोळखी शहर, काय गरज लागेल सांगता येत नाही.

मी खिडकीतून डोकावून पाहिलं, रस्त्यावर पाणी तुंबायला लागलेलंच होतं. लवकर इथून बाहेर पडणं गरजेचं होतं. तितक्यात फोन वाजला. विद्याचा होता. मी उचललाच नाही. मी ड्राइव्ह करताना फोन उचलत नाही, त्यामुळे मी बहुदा रस्त्यातच आहे असं ती समजणार. ट्रॅफिकची बोंब असेलच म्हणजे अजून अर्धा पाऊण तास तरी विद्याचा फोन येणार नाही, तोपर्यंत मी खरंच गाडीत असेन. मी मनाशी हिशेब केला. ही पोरगी अडकली तरी कुठे?

हा तर मी तिला माझा नंबर दिला. बऱ्याच दिवसांनी तिचा फोन आला. ती कोण हे कळायलाच मला बराच वेळ लागला पण आठवलं. चांगली सेटल झाली होती. नोकरी, हॉस्टेल. काही मित्र, मैत्रिणीही झाले होते म्हणे. मैत्रिणी ठीक आहे. पण ही अशी एकटी मुलगी, नवरा सोबत नाही, मित्राबित्रांपासून जरा दूर राहिली तर बरी असं आपलं माझं मत पडलं. दोन तीन वेळा फोन झाले. विद्याला सांगितलं, तर विद्या म्हणाली, घरीच बोलवा तिला. आता असं अनोळखी मुलीला घरी बोलवायचं म्हणजे? शेवटी विद्यानंच फोन लावून तिला बोलावलं.

विद्या म्हणजे पण एक अजब बाई आहे. नको तिथे ती एकदम दयाळू, मायाळू होते. मघा फोन घेतला असता आणि सांगितलं असतं की मी अजून इथेच आहे तर मग नो दया, माया. माझी बिनपाण्यानं हजामत केली असती तिनं फोनवर. असो. पण ही पारुल का आली नाही? मी घड्याळात पाहिलं. अर्धा तास होऊन गेलेला होता. खिडकीबाहेरच्या रस्त्यावर पाणी वाढायला लागलेलं होतं. तेवढ्यात इतका वेळ मला न सुचलेली गोष्ट मला सुचली. मी पारुलला फोन लावला. तिला बहुदा पावसाच्या आवाजात फोनचा आवाज ऐकू गेला नसावा. बरं कुठून येतेय हेही सांगितलं नव्हतं त्यामुळे तिला शोधायला बाहेर जाणंही शक्य नव्हतं. काय करावं अशा विचारात असतानाच रस्त्यावरून जवळजवळ गुडघाभर पाण्यातून चालत येताना पारुल मला दिसली. तिच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलं होतं. म्हणजे फूटभर तरी नक्कीच होतं.

घरी कसं जायचं ह्याचा विचार मी करत करतंच ऑफिसाच्या बाहेर पडलो. कुलूप लावलं आणि जिना उतरायला लागलो. आमच्या बिल्डिंगच्या जिन्यातपण तळाला पाणी भरलेलं. त्या पाण्यात उतरण्याचं टाळून मी तिची वाट पाहत तसाच उभा राहिलो. पाण्याच्या लाटा आधी आत आल्या आणि पाठोपाठ ती आली. नखशिखान्त भिजलेली, पांढरी ओली कुर्ती दंडाला चिकटलेली. ओले केस आणि त्यातून पडणारा पाऊस, चाफेकळी नाक, जिवणीवरचा पाण्याचा थेंब, मोठाले डोळे, एका खांद्यावर लॅपटॉपची बॅग आणि दुसऱ्या हातात कसलंतरी फुलाफुलाचं डिझाइन असलेली छत्री.

" काका" तिनं मला हाक मारली आणि मी भानावर आलो.
" अगं पारुल किती वेळ लावलास, मला काळजी वाटत होती फार. तुला पाहायलाच मी खाली उतरत होतो" खोटं का? मी मनातच विचार केला.
" काका किती काळजी करता तुम्ही माझी. उगाचच मी तुम्हाला थांबवलं. "
" बरं आता थांबवू नको. कारण विद्याला जर कळलं की मी अजून इथेच आहे तर माझं काही खरं नाही. आणि माझ्यावर एक उपकार करा. तू मला रस्त्यात दिसलीस असं सांगा काकूला. नाहीतर माझी चोरी पकडली जायची. "
" होय काका. " ती हसून म्हणाली. तिचे पांढरे शुभ्र दात दिसले. मोत्यांचा सरीसारखे.
" चला"

आम्ही दोघंही पाण्यातून वाट काढत पार्किंगपर्यंत गेलो. गाडीचे टायर थोडे पाण्यात होते. पण अजून गाडीच्या तळापर्यंत पाणी पोचलेलं नव्हतं. आम्ही दोघं गाडीत बसलो. मी देवाचं नाव घेतलं आणि गाडी सुरू केली. कंपाउंडमधनं गाडी बाहेर काढली आणि दाणदिशी कसलातरी आवाज झाला मी तशीच गाडी पुढे रेटली एखाद मीटर ती पुढे गेली आणि बंद पडली. गाडी सुरू करण्याचा मी निरर्थक प्रयत्न केला पण गाडी दाद देईना. शेवटी मी विद्याला फोन केला आणि झाला प्रकार सांगितला. विद्याचं असं मत पडलं की मी उगाच पारुलला घेऊन पावसातनं चालत वगैरे येऊ नये. ऑफिसातच थांबावं, संध्याकाळी पाऊस उतरला की मग दोघांनी घरी यावं. मलाही ते पटलं.

- क्रमशः -

Thursday, October 27, 2011

बदाबदा वाहणारं बूच

बऱ्याच दिवसांनी ब्लॉगकडे फिरकलो. बऱ्याच लोकांनी लिहिलेलं बरंच काही वाचून माझेही बाहू स्फुरणं पावू लागले. कॉम्प्युटर उघडला. आता असं जबरदस्त काही तरी टाइप करूया की बस्स. आय ऍम बॅक ची लै कानठळ्या बसवणारी अनाउंस्मेंट वगैरे करणारं काही बाही लिहून सुखानं झोपी जावं असा एक जबरदस्त विचार मनात येऊन गेला. पण त्यापलीकडे आणि लिहिण्यासारखं असं काहीच सुचलं नाही.

मग मी स्वतःला समजावलं की थोरा मोठ्यांना नाहीका रायटर्स ब्लॉक येतो, तसा तो मलाही आला असावं. रायटर्स ब्लॉक रायटर्स ब्लॉक म्हणजे तरी काय? मराठी लेखकाला बसलेलं बूच. म्हणजे मराठी लेखक वगैरे म्हणवणाऱ्यांना दोन दिवस परसाकडे जायची वेळ आली नाही किंवा जाऊनही झाली नाही की होते तशी होणारी अंतर्बाह्य तगमग? जाऊदे ब्लॉगर्सना अजून मराठी लेखकांच्या पंक्तीला बसवायला बऱ्याच लोकांची बरीचशी हरकत आहे. त्यात ब्लॉगर्स तसं नरम गरमंच खाणारे म्हणजे बद्धकोष्ठ व्हायची शक्यता तशी कमीच. तरीही माझं असं का व्हावं?

माझ्या आजूबाजूला प्रतिभेचा असा महापूर आलेला असताना आम्ही कोरडे पाषाण कसे काय राहिलो ह्याचा विचार करत असतानाच मला विषय झाला. बरोबर, मला विषय सुचत नाही. मला विषय होतो. वरती केवढ्या प्रसववेदना झाल्या ते वाचलंत ना, अशा बेसुमार कळा येऊन गेल्यावर एकदाचा विषय झाला. विषय झाला म्हणजे खरा प्रॉब्लेम सुरू झाला. नुसतं बाळ जन्माला घालून थोडंच भागतं, त्याचं पालनपोषण करावं लागतं. कपडे लत्ते, अगदी काही नाही तर नाही गेलाबाजार ग्रोसांच्या गणतीने नॅपीज आणावे लागतात.

ते हे बाळावरनं आठवलं. माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळी कुणीतरी लाडात येऊन आता लवकरच नवा पाहुणा येणार हं. वगैरे म्हणालं. तोंडदेखलं मी तोंडभर हसलो आणि हो म्हटलं. पण लगेच मनात आलं पाहुणा आला की स्वतःची बॅग घेऊन येतो, हा कसला पाहुणा? ह्याची बॅग घेऊन आम्हीच त्याच्या स्वागताला हास्पिटलात जायचं. मग त्या विनोदावर मनातल्या मनात तोंडभर हसून आणि जाहीर तोंडभर हसण्याचा कार्यक्रम तीन सेकंद आधी उरकल्यामुळे मनातल्या मनातलं हसू जाहीर न करण्याचा अट्टहास करीत असताना, खाली हात आया है खाली हात जायेगा वगैरे जबरदस्त फिलॉसॉफिकल गाणी आठवायला लागली.

माझं हे असं होतं. मी बोलत होतो झालेल्या विषयाबद्दल आणि हे खाली हात आया जाया व्हायला लागलं. अर्थात एकदम चुकीचं नाहीये ते. कारण माझ्या विषयांचं पण असंच असतं खाली हातच ते येतात आणि लिहून संपल्यावर लक्षात येतं अजून हातात काही आलंच नाही. पण हल्ली माझं असं भयंकर होतं. मन थाऱ्यावर नाही.

मन थाऱ्यावर नसण्याची अनेक कारणं आहेत. पण माझी पक्की खात्री आहे की माझ्या थाऱ्यावर नसलेल्या मनाचं कारण माझी साडेसाती आहे. परवाच कुठल्यातरी फोरमवरच्या माणसानं मेल केला होता म्हणे. तूळ राशीच्या लोकांना साडेसाती सुरू. ते वाचल्यापासून असं चाललंय बघा. गेलाबाजार नेटवर सगळ्या साडेसात्या सर्च केल्या. आता पुढची साडेसात वर्ष आमच्यावर शनीदेवांची कृपा, सॉरी अवकृपा असणार. ते शनीवरून आठवलं. कधीही कुणी शनीदेवांचं नाव घेतलं की मला पुनीत इस्सार आठवतो. होय होय तोच. महाभारतात ज्याने दुर्योधनाचं काम केलेलं आणि महाभारतातल्या समस्त ऋषिमुनींच्या दाढ्यांना लाजवतील असे अंगावरचे केस वागवत जो बेंबीच्या देठापासून ओरडून बोलायचा तोच तो. त्याला पुढे कुणीतरी सूर्यपुत्र शनीदेव पिक्चरात शनीदेव म्हणून घेतलं होतं. त्यामुळे शनीदेव, दुर्योधन आणि पुनीत इस्सार ह्यांचं काहीतरी जबरदस्त लिंकेज माझ्या बालमनावर ठसलेलं आहे.

लिंकेज वरून आठवलं. मी आता जे काही लिहिलं त्याचा मूळ विषयाशी काही संबंध होता का? नसावा. नसला तरी जोडता येईल. मी असंच ऍब्स्ट्र्रॅक्ट लिहितो असं मी उगाचच सगळ्यांना सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही विषयाचा मी कशाशीही संबंध जोडू शकतो अगदी पुनीत इस्सारशी देखील.

जी पेंटिंग्ज मला कळत नाहीत ती मला जास्त आवडल्याचं मी मान्य करतो. एका सुंदर कन्येबरोबर आर्ट गॅलेरीत एका अगम्य, चित्रविचित्र चित्राच्या समोर उभं राहून कन्यकेला इम्प्रेस करायला म्हणून वाह क्या बात है असं मी बोलून गेलो. कन्यका जवळ येऊन म्हणाली. वा, तुला समजलं मलाही समजाव ना. तेव्हाची फजिती वगळता माझी ही स्ट्रॅटेजी चांगली यशस्वी झालेली आहे. खरंतर मराठी माणसानं क्या बात है अशी दाद द्यायची काही गरज आहे का? पण हल्ली मी पाहतो ही परवलीची दाद आहे. आणखी मराठी दादा किंवा दादी (दाद चं अनेकवचन) म्हणजे माइंड ब्लोइंग, फँटास्टिक, फँटाब्युलस वगैरे वगैरे.

तर मी म्हणत काय होतो? काय म्हणत होतो ते नक्की समजत नाहीये, पण मी ऍबस्ट्रॅक्ट लिहितो ना, त्यामुळे मला नाही समजलं तरी वाचकांना त्यातून काहीतरी समजेल. माझी पेंटिंग स्ट्रॅटेजी वापरून कुणी वाहवा करणारी कमेंट करेल. मग एकाची दोन, दोनाच्या तीन, तीनाच्या वीस. वीस कमेंट्स येतील. दहाच्या वर कमेंट्स म्हणजे ब्लॉग सुपर डुपर हीटंच म्हणायचा, पुरुष ब्लॉगरांनी तरी. असं यश उगाचच मिळत नाही. तेवढं पी आर सांभाळावं लागता. आपली वाहवा करणाऱ्याची आपणंही व्याजासकट वाहवा करायची. कावळ्याने म्हणायचं गाढवाला, अहाहा काय हा तुझा आवाज, गाढवाने म्हणायचं कावळ्याला अहाहा काय रे तुझे हे दिसणे वर तुझी काव कावही खासंच.

असो तर मला सुचलेला विषय होता. काय होता? जो होता तो होता. म्हणजे तो होताही आणि नव्हताही. किंवा होत्याचं नव्हतं करणारा होता, नव्हे नव्हत्याचं होतं करणारा होता. हा आठवलं, रायटर्स ब्लॉक. लेखकाला बसलेलं बूच.

हे रे कसलं बदाबदा वाहणारं बूच?

Tuesday, June 07, 2011

अपूर्णा

पांढरी खोली एकदम शांत पहुडलेली होती आणि मीही पांढऱ्या खाटेवर. मालक नसलेलं कुत्रं जसं येणाऱ्या जाणाऱ्याची तमा न बाळगता शेपटी हालवत बसलेलं असतं अगदी तशी.

खालच्या लाकडी फ्लोअरवर कुणाच्या टोकदार बुटांचा आवाज झाला तेवढाच. ओळखीचा आवाज, ओळखीचा चेहरा. कुणाचा? कुणाचाही असेना का? आपलं ते शांततेचं चाललं होतं. कुणाला बोलू नका पण खरं सांगायचं तर मला शांततेचाही आवाज येतो. सगळं शांत असताना कानात कुईं करून आवाज येतो. येतो की नाही? अपर्णाला वाटतं माझ्या कानात प्रॉब्लेम आहे. तिच्यासाठी तीन वेळा डॉक्टराकडे पैशाचा पाऊस पाडून आलो, पण तरीही येतोच. अर्थात तिला आता मी सांगितलंय की आवाज यायचा बंद झालाय म्हणून आणि तसाही आला थोडा शांततेचा आवाज तर बिघडलं कुठं. तेवढीच जरा ओक्या खोलीतली बोकी वर्दळ.

बाकी अपर्णानं काळजी करणं काही चुकीचं नाहीये. दोन वेळा शिंक आली की तिसरी यायच्या आत डॉक्टरांच्या दवाखान्यात पोचणारी ती. ती डॉक्टरकडे जा म्हणून माझ्या मागे लागली नाही तरच नवल. वर तिला म्हटलं डॉक्टरकडे पैसे टाकणं बंद कर तर मलाच बोलेल, मला काही तिची काळजीच नाही म्हणून. काळजी नाही कशी? आहे म्हणजे आहेच, पण आठवड्यातून दोनदा ती डॉक्टरकडे गेली तर अजूनच काळजी वाटणार की नाही? त्यात त्या डॉक्टरचं काही खरं नाही. उंचापुरा, नाकी, डोळी नीटस. त्याला काय अपर्णासारखी देखणी पेशंट नक्कीच आवडत असणार. मग तोही देत असेल थातुर मातुर औषध म्हणजे हिचं आपलं तिथे जाणं चालूच.

जाऊदे. मी सांगितलं तर तिला समजायचं नाही. पण एकंदरीत डॉक्टरांची जमात तशी लबाडंच. तो कानाचा डॉक्टरही तसाच. अरे हो कानावरून आठवलं. ते कानातलं सोनाराकडून आणायचं राहिलंय. पॉलिश करायला दिलंय अपर्णानं. आज आणायचं होतं की उद्या? बहुतेक आजच. आता माझी काही खैर नाही. ह्या बायकांचं ना मला काही कळतच नाही. म्हणजे बघा, कानातलं, नाकातलं, गळ्यातलं ही सगळी कसली लक्षणं आहेत? बैलाच्या नाकातून वेसण घालतात, त्याच्यावर ताबा मिळवण्यासाठी. गुलामगिरीची प्रतीक आहेत हे दागिने वगैरे. अपर्णासारख्या पुरोगामी बाईलाही ती आवडावीत म्हणजे कमाल आहे.

पण काय करा बाबांनो, पुरुषाचा नवरा झाला की त्याचा वेसण न घातलेला बैल होतो. मग तो आपल्याच शिंगानं आपली पाठ खाजवायचा प्रयत्न करीत राहतो. शिंग पाठीला लागत नाही, खाज काही जात नाही. मग काय करेल, फिरत राहतो बिचारा गोल गोल गोल गोल खळात. आणि बायको? बायको नवऱ्याची मजा तेवढी बघत राहते. आणि वर धान्य मळून घेते ते वेगळंच.

हो हल्ली धान्याच्या दारूवर लक्ष केंद्रित करणारेत म्हणे. कालच पेपरात वाचलं. करा लेको, धान्याची दारू करा, ऊसाची दारू करा, अजून कसली करा. ती दारू पिऊन लोकं होऊदेत दारुडे. बरं, दारुड्या लोकांची गरज सर्वात जास्त कुणाला असते सांगा? म्हणजे तुम्हाला, मला, त्यांच्या घरच्यांना, कुणाला? नाही ना ओळखलंत. अहो व्यसनमुक्ती केंद्रांना. दारुडेच नसतील तर व्यसनमुक्ती केंद्रातल्या लोकांनी करायचं काय? बरं प्रश्न नुसता त्यांनी करायचं काय हा नाही. प्रश्न आपण दारुड्यांवर केलेल्या उपकाराने स्वतःच फुलून जाऊन स्वतःची कॉलर ताठ करण्याचा आहे. तरी मी अपर्णाला सांगत असतो. कॉलरवाले खादीचे पंजाबी ड्रेस घालत जा म्हणून.

कॉलरवले पंजाबी ड्रेस? नवी फॅशन आहे की काय आज कालची ही. अपर्णाला विचारून पाहिलं पाहिजे. खादीच्या फॅशन्स तिला चांगल्या माहीत असतात. खादीचे सदरे, खादीचे लेंगे, खादीच्या टोप्या. परवा असंच झालं, काहीतरी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी वगैरे. म्हणून म्हणे खादी घालावी. म्हटलं हे लेंगे सदरे वगैरे ठीक आहेत, पण खादीची अंतर्वस्त्र कुठे मिळतात? मिळतात का? नाहीच मिळत. मग हे खादीवाले घालतात काय आत? घालतात की घालतंच नाहीत? त्यावर उत्तर नव्हतं तिच्याकडे. म्हटलं कसलीही घाल, काढणार तर मीच आहे ना.

कसलं कसलं रोमँटिक बोलून गेलो मी. पण अपर्णाचं दुसरंच. रागावली. फुरंगटून बसली. फुरंगटून. जबरी शब्द आहे. हगल्या पादल्या फुरंगटून बसायला अपर्णाला आवडतं. आवडतं म्हणजे तिचा छंदच आहे तो. तिला म्हटलं डॉक्टरकडे जाणं कमी कर, लोकं काही बाही बोलतात बसली फुरंगटून. घराकडे लक्ष दे, लोकांची व्यसनं मग सोडव, बसली फुरंगटून. आता घरी आली आणि तिची 'नाकातली वेसण', आपलं ते हे, 'कानातलं कानातलं' मी आणलेलं नाही हे लक्षात आलं की बसेल फुरंगटून. कानातलं कानातलं? काहीतरी चुकल्यासारखं नाही का वाटत?

असूदे. चुका काय माणसाच्या होतंच असतात. चुका माणसांच्या होतात, चुका बायकांच्या होतात. नको त्या वेळी नको ती चूक झाली की त्यातून अजून माणसं आणि बाया तयार होतात. तयार झालेल्या हा माणसांच्या आणि बायांच्या अजून चुका. चुकांवर चुका. चुकांवर चुका. उंच चुका, बुटक्या चुका, गोऱ्या चुका, काळ्या चुका. जाड चुका बारीक चुका. अपर्णाला कानी कपाळी ओरडून सांगितलं अचूक काहीच नसतं ग या जगात. असतात त्या फक्त चुकाच. नाही पटलं. दारुड्यांची चुकलेली आयुष्य सुधारणं जास्त महत्त्वाचं आहे का?

अजून कशी आली नाही ही? गेली की काय त्या सोनाराकडे कानातलं आणायला? कानातलं? वेसण, बैल. खाज. होय खाज, मग शिंगं, माझी. खाज माझी, पाठही माझीच. सोनाराकडे नसेल. गेली असेल त्या डॉक्टराकडे. उंचा, पुरा, नाकी डोळी नीटस. खादीचा कॉलर नसलेला सदरा, खादीचा लेंगा आणि खादीची. पण ती तर मी उतरवणार. डॉक्टर तुला सोडणार नाही मी. परवा माझ्या कानात मळ काढायच्या बहाण्याने सुरा खुपलास आणि माझ्या कानाचा पडदा फाडलास हरामखोरा. आता कसा ऐकणार मी शांततेचा आवाज?

खालच्या लाकडी फ्लोअरवर पुन्हा कुणाच्यातरी टोकदार बुटांचा आवाज. ओळखीचा आवाज, ओळखीचा चेहरा, खादीचा कुर्ता, खादीचा लेंगा, सोन्याचे कानातले, नसलेली कॉलर. कोण ही?

Sunday, May 30, 2010

कर्णिक बाई.

कर्णिक बाई.

पाचाच्या आसपासची उंची. लांब असावेत असे केस. केसाला चापून चोपून तेल लावलेलं आणि घातलेली वेणी. अदमासे पन्नाशीच्या आसपासचं वय. डोळ्याला लावलेला, बहुतेक काळ्या किंवा कुठल्यातरी जाड डार्क बॉर्डरचा चष्मा. चष्म्यापाठचे मोठ्ठे, टपोरे डोळे, किडकिडीत शरीरयष्टी, लांबसडक बोटं आणि बोटांवरून गिरक्या घेत फिरत जाणाऱ्या हाताच्या नसा. अशा आमच्या कर्णिक बाई.

साधारण पंचवीस वर्ष उलटून गेली, त्यामुळे कर्णिक बाईंचं माझ्या डोक्यातलं चित्र कदाचित धूसर झालं असेल. झालं असेल नव्हे झालं आहेच. पण पंचवीस वर्ष उलटून गेली तरी मनाचा एक कोपरा त्यांनी अजूनही व्यापून ठेवलेला आहे.

अगदी लहान चार पाच वर्षाची मुलं, त्यांच्या आई बापांचे हात घट्ट पकडून, रडत भेकत, बाहेरच्या जगाला घाबरत शाळेत येत. मुलांच्या घट्ट हातांची पकड सोडवताना, त्यांचे रडवेले चेहरे पाहता पाहता त्यांना टाटा करताना, आई बापांना यातना नक्की होत असतील. पण आपण आपल्या मुलांना एका तेवढ्याच प्रेमळ, आपुलकीनं करणाऱ्या हातांत सोपवून जात आहोत हे समाधान त्यांना कर्णिक बाईंनी दिलं असेल.

मातीपासून मडकं बनवण्याचं काम, माती मळून त्या मातीचा गोळा करण्यापासून सुरू होतं. फिरत्या चाकावर तो मातीचा गोळा ठेवून त्याला आकार देणाऱ्याचं नेहमी कौतुक होतं. पण मातीत योग्य तितक्या प्रमाणात पाणी मिसळून, मातीला आकार द्यायची लायकी मिळवून देणाऱ्याचं काय? आमच्या कर्णिक बाई अशांच एक होत्या. आम्ही सर्व मुलं, पुढे मोठी झालो. कुणी डॉक्टर, इंजिनिअर झाले, कुणी उद्योगधंद्यात नाव कमावलं. खारीचा का होईना पण आमच्या कर्णिक बाईंचा त्यात वाटा होता? त्याची पोच आम्ही कधी त्यांच्यापर्यंत पोचवली का?

अजून तो दिवस लख्ख आठवतो. दहावीचा रिसल्ट नुकताच लागला होता. पेढे वाटप जोरात चालू होतं. मी अतुलला म्हणजे माझ्या सख्ख्या मित्राला म्हटलं की आपण कर्णिक बाईंकडे जायला हवं. त्यानंही ती कल्पना उचलून धरली. आम्ही दहावीला धडकेपर्यंत कर्णिक बाई रिटायर झालेल्या होत्या. तरी शाळेतून त्यांचा पत्ता मिळवला. पत्ता सहज सापडण्यासारखा नव्हता. विचारत विचारत आम्ही माग काढत गेलो. दार वाजवलं. बाईंनी स्वतःच दार उघडलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाईंनी बघताक्षणी आम्हाला ओळखलं. आत बोलावलं, अगदी लहान मुलांना द्यावा तसा आम्हाला खाऊही दिला. बाईंना पेढे देऊन वाकून नमस्कार केला. बाईंचे पाणावलेले डोळे बघून मला कसंसंच झालं.

त्यांच्या वर्गात होतो तेव्हा त्या मला रडूबाई म्हणायच्या. कोणत्याही फालतू कारणासाठी किंवा त्याशिवायही मी भोकांड पसरायचो. बाई प्रेमाने रडूबाई म्हणायच्या, पुसटसं आठवतं, तेव्हाही एक आनंद व्हायचा. दोन क्षण बाई नजरेआड झाल्या तरी माझे डोळे भरून यायचे. आई नजरेआड झाली म्हणून रडल्याचं मला आठवत नाही पण कर्णिक बाई नजरेआड झाल्या की मुसमुसून रडलेलं माझ्या अजूनही चांगलंच स्मरणात आहे.

तर बाईंकडे पेढे देऊन आलो. दोन दिवसांनी माझ्याच शाळेत जाणाऱ्या माझ्या बहिणीबरोबर बाईंनी एक पत्र पाठवलं आणि मला आणि अतुलला म्हणून दोन पेनंही पाठवली. अतुलचं पेन मी अतुलला दिलं, पण पत्र मात्र दिलं नाही. वाचायला नक्की दिलं पण परत मागून घेतलं. अजूनही ते पत्र माझ्याजवळ आहे. बाईंनी लिहिलं होतं, की आम्हाला पाहून त्या एकदम गोंधळून गेल्या. काय बोलावं तेही त्यांना सुचलं नाही. पुढे हेही लिहिलं की आम्ही त्यांची आठवण ठेवून त्यांना पेढे द्यायला गेलो ह्याचा आनंद त्यांना सर्वोत्तम शिक्षकाच्या सरकारी पुरस्कारापेक्षाही जास्त आहे. अजूनही घरी गेलो. चुकून कपाट उघडलं तर ते पत्र हाती लागतं. बाईंना भेटल्याचा आनंद होतो.

त्यांचा पत्ता अजूनही लक्षात आहे. म्हणजे बिल्डिंगचं नाव लक्षात आहे. बाकी घर नंबर वगैरे विसरलो. शिवाजी पार्कला गेलो की हमखास बाईंची आठवण यायची. अगदी लग्नाचं आमंत्रणही त्यांना पाठवलं. लग्नाआधी फार थोडे दिवस भारतात आल्यानं स्वतः जाऊन आमंत्रण करणं शक्य झालं नाही. खरं सांगायचं तर कर्णिक बाई आहेत का नाहीत हीसुद्धा माहिती मला नव्हती. अर्धवट पत्त्यावर पत्रिका पोचेल की नाही ह्याची खात्री नव्हती. लग्नाच्या गडबडीत कर्णिक बाई आल्या नाहीत हे लक्षातही आलं नाही. काही दिवसांनी एक मनी ऑर्डर घरच्या पत्त्यावर आली बाईंनी मला लग्नाचा आहेर म्हणून पाठवली होती. त्या आहेरापेक्षा बाई अजून आहेत हे समजल्यानं मला खूप बरं वाटलं होतं. मनाशी खूणगाठ बांधली, की पुढच्या वेळी आलो की जाऊन बाईंना नक्की भेटायचं.

एक वर्ष गेलं. दोन गेली. करता करता चार वर्ष गेली. चारदा भारतात जाऊन आलो. अनेकदा शिवाजी पार्कलाही गेलो असेन पण काही ना काही कारणाने आठवण येऊनसुद्धा मी बाईंना भेटायचं जमवलं नाही. आता अपघाताने कळलं, बाई देवाघरी जाऊनही दोन वर्ष झाली. कुणीतरी कानफटात मारावी तसं मला झालं. बाईंना भेटायचं राहूनच गेलं.

घराच्या चार भिंतीच्या बाहेर पडल्यावर हरवून जाण्याची वेळ पुढे अनेकदा आली, पण प्रत्येक वेळी हात धरायला कर्णिक बाई भेटल्याच असं नाही. पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कधी मित्रांशी बोलताना, कधी बायकोला माझ्या लहानपणाबद्दल सांगताना, कधी मनातल्या मनात जुन्या आठवणीत रमताना कर्णिक बाई भेटतच राहिल्या. पण आता त्या पुन्हा कधीच भेटणार नाहीत ह्या कल्पनेनं, त्या दोन क्षण नजरेआड झाल्यावर पंचवीस वर्षापूर्वी जसं मुसमुसून रडायला यायचं.

अगदी तसंच.

Wednesday, September 02, 2009

वेटिंग रूम

लांबच्या लांब पसरलेला रेल्वेचा प्लॅटफॉर्म. त्यच्या दूरच्या टोकाला असलेला पिवळ्या रंगाचा आणि काळ्या अक्षरांनी लिहिलेला स्टेशनच्या नावाचा बोर्ड. डोक्यावर काळंभोर आकाश आणि आकाशाच्या काळ्या रंगाला लागलेली पौर्णिमेच्या चंद्राची तीट. एकदम छोटंसंच पण टुमदार स्टेशन. स्टेशनमध्ये शिरायच्या ठिकाणी असलेली पत्र्याची शेड. त्या शेडच्या वरच्या बाजूला असलेलं स्टेशन मास्तरचं घर कम ऑफिस. पुढची गाडी सकाळीच यायची असल्याने तिथेही सामसूमंच. शेडच्या एका कोपऱ्यात बिरजू भंगी अंगाची मुटकुळी करून झोपलेला.

त्याच्या उजव्या अंगाला वेटिंग रूम. "प्रतीक्षा कक्ष" अशी पाटी वर लिहिलेली. आत मिणमिणता उजेड. स्टेशनच्या बाहेरून पावलांचा आवाज. कोल्हापुरी वाहणा करकरवत एक माणूस स्टेशनच्या आत शिरला. हातात एक छोटीशी बॅग. स्वच्छ धुतलेला पांढरा शुभ्र सदरा, काळी विजार. डोळ्याला लावलेला जाड काळ्या फ्रेमचा चश्मा.

बिरजूच्या डोक्यावर तेवत असलेला साठ डीग्रीचा बल्ब सोडला तर बकी सगळा अंधारच. वेटिंग रूम कुठे आहे ते बिरजूला विचारण्यासाठी तो बिरजूकडे गेला.

" अहो शुक शुक" त्याने हळूच पुकारलं. बिरजूचं पूर्ण दुर्लक्ष.
" माफ करा तुम्हाला झोपेतून उठवतोय, पण तेवढी वेटिंग रूम कुठे आहे ते सांगता का? " बिरजू तसाच पडलेला.
" अहो मिस्टर, तुमच्याशी बोलतोय मी." ह्याचा आवाज थोडासा चढा. बिरजू एकदम घोरायला लागलेला.

घोरणाऱ्या बिरजूकडे निराश होऊन पाहत माणूस स्टेशनात शिरला. बाजूलाच "प्रतीक्षा कक्ष" असल्याचं त्याला समजलं. पण प्रतीक्षा कक्ष उघडून द्यायला स्टेशन मास्तर कुठे शोधायचा ह्या विचारात असतानाच त्याला दरवाजा उघडा असल्याचं दिसलं. कुणीतरी दुसरंही तिथे आहे ह्याचं त्याला आश्चर्यच वाटलं. पण स्टेशन मास्तरला धुंडायचा त्रास वाचला म्हणून बरंही वाटलं.

तो घाईघाईने आत शिरला. अख्या रूममधला एकमेव दिवा आपल्यापरीनं उजेड पाडण्याच्या प्रयत्नात. दिव्याच्या खालच्या आरामखुर्चीत कुणीतरी बाई.तिच्या तोंडावर पुस्तक ठेवलेलं. बहुतेक दिव्याच्या प्रकाशाला अडथळा करून झोपण्याचा तिचा प्रयत्न. कमीत कमी आवाज करीत तो समोरच्या बकड्यावर आपली बॅग टाकतो आणि बाजूच्या खुर्चीत जाऊन बसतो. कुठल्या काळातली ती खुर्ची त्याच्या वजनासारशी कडकन मोडते. पडता पडता तो वाचतो पण आवाजाने बाई एकदम जागी होते.

" काय झालं? कोण आहे? " ती ओरडली.
" कुणी नाही मी आहे"
" कोण तुम्ही? "
" तुमच्यासारखाच. वेटिंग फॉर नेक्स्ट ट्रेन"
" ओह, माफ करा. आवाजाने एकदम दचकले आणि ओरडले"

मोडलेल्या खुर्चीवरचं लक्ष त्याने तिच्याकडे नेलं. मघा बाई वाटलेली ती बाई म्हणण्याएवढीही मोठी नव्हती. फार फार तर पंचविशीच्या आत बाहेरचं वय. कोवळा चेहरा, कपाळावरची काळी टिकली. तोंडावर ठेवलेल्या पुस्तकाने विस्कटलेले केस. आणि अतिशय भावपूर्ण तरल डोळे. आपल्या निम्म्या वयाच्या असलेल्या मुलीकडे असं पाहणं बरं नाही हे लक्षात येईपर्यंत बरेच क्षण गेले. चटकन स्वतःला सावरत तो दुसऱ्या खुर्चीकडे गेला. ती भक्कम असल्याची खात्री करून बसला.

" माफ करा, माझ्यामुळे तुमची झोपमोड झाली" तो म्हणाला
" नाही हो. तशीही झोप येणार नव्हतीच म्हणून वाचत बसले होते. वाचायचा कंटाळा आला म्हणून डोळ्यावर पुस्तक घेऊन शांत बसलेले. झोपले नव्हते. विचार करत होते, सकाळपर्यंत वेळ कसा काढायचा? "
" कुठे निघालात"
" तुम्ही मला अहो जाहो नका हो करू, प्लीज"
" अहो पण असं... "
" प्लीज काका"

तिने काका म्हटल्यावर त्याच्या चेहऱ्यावर आलेली निराशा अंधारात झाकायचा असफल प्रयत्न त्याने केला

" बरं नाही अहो जाहो करणार. पण मला काका नाही म्हणायचं"
" ... "
" हो हो मला माहितेय मी तुझ्या काकाच्या वयाचा नक्की आहे. पण उगाच कशाला आठवण करून द्यायची म्हाताऱ्याला वयाची"
" बरं. काका नाही म्हणत. मग म्हणू काय पण? "
" धोत्रे म्हण"
" धोत्रे? "
" हो धोत्रे. माझं नाव धोत्रे"
" छान नाव आहे हं.... धोत्रे"
" कर चेष्टा कर म्हाताऱ्याची"
" धोत्रे. चेष्टा नाही. पण एकदम अनपेक्षित नाव होतं बाकी काही नाही"
" हं"

धोत्र्यांनी उगाचंच आपली बॅह उघडली, बॅगेतलं सामान इथे तिथे केलं. डोक्याला तेल लावावं म्हणून ते तेलाची बाटली शोधत राहिले. पण ती काही त्यांना मिळाली नाही. मग तसेच ते खुर्चीत पुन्हा येऊन बसले. त्यांच्या सगळ्या हालचली ती बघत राहिली.

" रात्री कशी तू इथे? "
" काय सांगू काका.... सॉरी सॉरी धोत्रे, रात्रीची मेल गाठायची होती, ती चुकली. मग काय करते? बसलेय सकाळच्या गाडीची वाट पाहत. आणि तुम्ही? "
" माझं काय? रेल्वेने फुकट पास दिलाय. फिरत असतो इकडून तिकडे. आपली एक बॅग असते सोबत. मिळाली तर गाडी नाहीतर वेटिंग रूम. आहे काय अन नाही काय"
" असा बरा तुम्हाला फुकट पास दिला. आम्हाला नाही कधी दिला तो"

निरागसपणे तिने विचारलं. धोत्र्यांना तिच्या प्रश्नाचं हसूच आलं. भुवयांचं धनुष्या झालेलं. नाकपुड्या थोड्याशा फुगलेल्या.

" हो मग तुला का देतील ते फुकट पास?"
" पण तुम्हाला तरी का देतील ते"
" हं"
".... "
" आगगाडी पाहिल्येस? "
" हो"
" त्याला एक इंजीन असतं. कधी कधी दोनही असतात. कधी कोळशाचं असतं, कधी डिजेलवर चालणारं असतं, कधी विजेवर, तर कधी... "
" धोत्रे, मला इंजिनाचे प्रकार सांगू नका. तुम्हाला फुकट पास का मिळाला ते सांगा"
" हा. सांगतो. तर ते इंजीन जो ड्रायव्हर चालवतो... "
" ड्रायव्हर काय हो. मोटरमन"
" हं मोटरमन. तो होतो मी. म्हणून मला फुकट पास"
" अय्या, तुम्ही मोटरमन होता धोत्रे? मला एकदा तरी इंजिनात बसून जायचं होतं, नाही नेलं कुणी. "
" मी नेलं असतं"
" अजूनही नेऊ शकाल मनात आणलंत तर"
" नाही. आता मी नाही चालवत इंजिन"
" का? "
" बस. नाही चालवत सांगितलं ना?" धोत्र्यांचा आवाज किंचीत चढला.

तिने माघार घेतली. उगिचंच तिने आपलं डोकं पुस्तकात खुपसलं. वाचनात तिचं लक्ष नव्हतं. हा माणूस एकदम का भडकला हेच तिला कळेना. पण उगाच आगीत तेल नको म्हणून ती गप्प बसली. धोत्र्यांनी आपला जाड काळ्या फ्रमच्या चश्मा काढला आणि शर्टाच्या टोकाने तो ते साफ करायला लागले.

" एवढा स्वच्छ शर्ट खराब होईल ना" काहीतरी बोलायचं म्हणून ती बोलली
" स्वच्छ शर्ट खराब होतात पण परत धुता येतात. आठवणी.. "
" हो मान्य. तुम्हाला नसेल लागत धुवायला पण बायकोला लागत असेलच ना"
" नाही. आता नाही लागत. मी असा भटक्या. शर्ट धुवायला घरी जाऊ का? "
" .... "
" आणि तू गं? तुझं घर? "
" ..... "
" काय झालं? बोल की? "
" ..... "
" कट्टी आहे का? "
"...... "
" ..... "
" सासर ह्याच गावात आहे माझं"
" अच्छा म्हणजे माहेरी निघालीस. कुठे? "
" ...... "
" अगं सासर ह्याच गावात आहे म्हणतेस मग वेटिंग रूममध्ये कशाला?"
" माझी मर्जी" तिने उत्तर झटकलं आणि विषय संपवला.

धोत्रे तिच्याकडे बघत राहिले. अतिशय कुलीन शालीन असं सौंदर्य. अशा ह्या मुलीला आपल्या घरी न राहता वेटिंग रुममध्ये रात्र काढाविशी का वाटावी? तिच्याकडे बघता बघता त्यांची तंद्री लागली.

" पळून आलेय" ती म्हणाली.
" पळून? का? "
" माझी मर्जी"
" बरं"
" बरं नाही. नवरा म्हणाला माहेरी चालती हो"
" तुला? शक्यच नाही. अगं पोरी भांडणं सगळ्याच नवरा बायकोची होतात. रागाच्या भरात बोलून जातं माणूस. पण म्हणून काही कुणी.... "
" रागाच्या भरात नाही"
" मग"
" मग काय मग धोत्रे? नशिबाचे भोग दुसरं काय? "
" मला वाटायचं नशिबाचे भोग फक्त आमच्यासारख्यांच्याच वाट्याला येतात. पण... "
" हं. दृष्ट लागण्यासारखा संसार होता माझा. जिवापाड प्रेम करणारा नवरा. घर आवार शेजार सगळं सगळं होतं"
" मग? "
" जाऊदे हो माझं. तुम्ही सांगा. तुम्ही का घर सोडून भटकताय असे? "
" मी? माझंही घर होतं. संसार होता. साधी का असेना नोकरी होती. रेल्वेचा फुकट पास वर. काळजी घेणारी बायको"
" .... "
" अचानक सगळं बदललं बघ. नोकरीवरून सस्पेंड केलं. अगदी वेड लागायची पाळी आली"
" का? "
" ऍक्सिडेंट"
" कुणाचा? "
" सकाळी सकाळी स्टेशनात शिरतानाच एक मुलगी गाडीखाली आली. सरळ सस्पेंड केलं. निग्लिजन्स म्हणून. नोकरीचं काही नाही पोरी, पण आपल्यामुळे कुणाचा जीव गेला, ह्याच दुःखाने वेडापिसा झालो आणि एक दिवस..."

धडधड धडधड करीत एक मालगाडी स्टेशनात शिरली आणि तिचा एकेक डबा वेटिंग रुमसमोरून जाऊ लागला. जवळ जवळ पाचेक मिनिटं ती लांबच लांब डब्यांची माळ जात राहिली. दोघंही निःशब्द होऊन तिच्याकडे पाहत बसले. आगगाडी गेली तसे धोत्रे भानावर आले. तिची तशीच तंद्री लागलेली.

" मालगाडीही चालली असती. पण नेमका डोळा लागला आणि सकाळपर्यंत.. " ती म्हणाली.
" काय? काय म्हणालीस"
" नाही काही नाही. मालगाडी स्टेशनवर थांबली असती तर त्यानेही जायची तयारी होती माझी"
" अगं पण असं झालं तरी काय? चांगला नवरा आहे म्हणतेस"
" हं"
" मग? "
" काही नाही धोत्रे, कशाला जुन्या आठवणी?"
" ... "
" सगळं सुरळीत चाललं होतं, आणि कुणाची दृष्ट लागली माहीत नाही धोत्रे, पण पाठीवर बरोबर मध्यभागी एक पांढरा डाग उमटला. कोड होता तो. हळू हळू, पाठीवरून तो इतरत्रही पसरला, अगदी चेहऱ्यावरही"

अंधारातही चेहऱ्याची एक बाजू तिने केसांनी झाकलेय हे धोत्र्यांच्या लक्षात आलं

" पहिल्यांदा नवऱ्याने सहानुभूती दाखवली. डॉक्टर केले, वैदू केले. घोरी अघोरी सगळे उपाय केले. देवाचं केलं. पण काहीही होईना कोड वाढतंच चाललेलं. शेवटी त्याचा संयम सुटला. म्हणाला अशी बायको मला नको. तू हे घर सोडून जा"
" ... "
" मी खूप विनवण्या केल्या धोत्रे, गया वया केली कशाचाही परिणाम झाला नाही. एक दिवस रात्री उठले इथे आले. रात्रीची गाडी हुकली. इथेच ह्या वेटिंग रूममध्ये रात्र काढली. सकाळची गाडी आली तशी समोर रुळावरच उडी मारली. गाडी सरळ अंगावरून गेली. सगळा खेळच संपला. धोत्रे"

शॉक लागल्यासारखे धोत्रे ताडकन उभे राहिले.

" काय झालं धोत्रे? घाबरलात? "
" नाही"
" मग? "
" ज्या ऍक्सिडेंटने माझी नोकरी गेली, मी जवळ जवळ वेडा झालो आणि वेडाच्या भरात बेगॉन पिऊन आत्महत्या केली, तो ऍक्सिडेंट ...."

धडधड करीत गाडी स्टेशनात शिरली. गाडीच्या आवाजासरशी बिरजू जागा झाला. गाडी गेल्यावर रोजच्या शिरस्त्याप्रमाणे वेटिंग रूममध्ये शिरला. समोरची मोडकी खुर्ची पाहिली. रातभर कुत्र्यांनी ओरडून ओरडून जीव हैराण केला. बहुतेक इथेच येऊन धुमाकूळ घातला असणार अशी मनाची समजूत करून घेऊन तो खोली झाडायला लागला.